पंचमदाच्या गीतांनी रसिक झाले चिंब

नागपूर : पावसाळा आला तरी अजुनही नागपूरकरांची मने कोरडी ठक्क आहेत. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागपूरकरांना गुरुवारी मात्र सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन म्हणजेच पंचमदा यांच्या गीतांना चिंब भिजवले.
‘म्युझिक ॲण्ड मी’इव्हेंट्स आणि ‘रॉक ऑन’चा संयुक्त विद्यमाने लोकप्रिय संगीतकार पंचमदा म्हणजेच आर. डी. बर्मन यांना ८० व्या जन्मतिथीनिमित्त स्वरांजली वाहण्याकरीता ‘हिट्स ऑफ आर. डी. बर्मन’ या संगीतमय कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर येथील सायंटिफीक सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला जेसीआय नागपूर कलर्सच्या संस्थापक अध्यक्ष रेणुका वर्मा, टेलेस्टो एज्यु. फोरमचे संचालक आनंद सक्सेना, ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता ॲड. शालिनी सक्सेना, कायस्थ समाजचे अध्यक्ष सुशील श्रीवास्तव, सचिव प्रशांत श्रीवास्तव, गीता अय्यर, मयूर कन्ट्रसीक्शन लिमिटेडचे संचालक विरेंद्र श्रीवास्तव, रोसेटा एलिट क्लबचे संचालक मनिष लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची संकल्पना ‘म्युझिक ॲण्ड मी’च्या संचालिका शालिनी सिन्हा व ‘रॉक ऑन’चे संचालक इरफान खान यांची होती तर संगीत संयोजन अजित भालेराव व राजा राठोड यांचे राहणार होते. शोएब खान, रितेश कुलसुंगे, सुषमा रानडे काणे, श्रीकांत ब्राह्मणे, भूपेश मेसराम, विलास डांगे आणि हरीश कश्यप आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली विविध गीते सादर केली.
शालिनी सिन्हा यांनी रैना बिती जाये या गीताने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. एक दिन बिक जायेगा हे गीत विलास डांगे यांनी तर तुमने मुझे देखा हे गीत श्रीकांत यांनी उत्कृष्टरित्या सादर केले. रितेश यांनी जिंदगी आ रहा हूँ मै हे गीत सादर करीत रसिकांच्या टाळ्या घेतल्या. सुषमा यांनी सादर केलेल्या ऐसा समां ना होता या गीतानंर हरिशने गाण्यांची लड सादर केली. एक लडकी को देखा, जाना ओ मेरी जाना, रूप तेरा मस्ताना, हम दोनो दो प्रेमी, रिमझिम रिमझिम अशी एकाहून एक सरस गीते गायकांनी यावेळी सादर केली. पंचमदा यांनी अनेक युगल गीतेही कलाकारांनी यावेळी सादर केली. कार्यक्रमाचा शेवट सुषमा व रितेश यांनी दुनिया में लोगो को या गीताने केला. रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत गायकांचे कौतूक केले. शाहिद कुरेशी यांनी अतिशय समर्पक असे निवेदन करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

error: Content is protected !!