एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवार साहेबांनी सार्वजनिक करावीत: प्रकाश आंबेडकर

मोदी सरकार चे पितळ उघडे पडणार !

अकोला: बहुचर्चित एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेबांनी सार्वजनिक करावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ही कागदपत्रे सार्वजनिक करण्याची विनंती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केली आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. पत्रासोबतची ही कागदपत्रे सार्वजनिक करून शरद पवार यांनी मोदी सरकारचे पितळ उघडे करावे, प अशी विनंती ही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केली आहे.

एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. आता या पत्रावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एल्गार परिषदेसंदर्भात केंद्रातील भाजप सरकारचा पर्दाफाश करण्याची ही संधी असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात संघ विचारांचे भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

एल्गार परिषदेसंदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन फडणवीस सरकारच्या तपासावरही टीका केली होती. अलीकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एल्गार प्रकरण बोगस असून संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहेत, असा आरोप शरद पवार यांनी पत्रात केला आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे शरद पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावीत. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे, याची माहिती लोकांना होईल, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देणारच, अशी अपेक्षा सरते शेवटी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!