प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निडवणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही 2024ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडी करण्यासाठी चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नाना पटोले  अकोल्यात आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना पटोले यांनी हे मोठं विधान केलं. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!