वाघाचे अवयव तस्करी करणारा गजाआड

वाघाचे अवयव तस्करी करणारा गजाआड

नागपुर वनविभागाच्या टीम मध्यप्रदेशात धाड टाकून केली अटक

नागपूर : येथील वनविभागाच्या टीम ने मध्यप्रदेशात धाड टाकून वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली. मोतीलाल केजा सलामे (५५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात तो राहतो.

नागपुर वनविभागाने दिलेल्या माहिती पत्रकानुसार, नागपुर वनविभागाच्या टीमने २९ जुलै रोजी मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात राहत असलेल्या मोतीलाल केजा सलामे याच्या शेतशिवाऱ्यात असलेल्या घरात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्याच्या घरात नागपुर वनविभागाच्या टीमला वाघाचे संपूर्ण कातडे व वाघाचे चार पंजे आढळले. आरोपी मोतीलाल केजा सलामे याला नागपुर वनविभागाच्या टीमने अटक करुन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६), ९, ३९, ४९, ४३ (ए), ५० व ५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोतीलाल केजा सलामे याला सावनेरच्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करण्यात आले. कोर्टाने ३ ऑगस्ट पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

हि कारवाई उपवनसंरक्षक नागपुर डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-२) उमरेड एन. जी. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (खापा) पी. एन. नाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी (बुटीबोरी) एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) एस. बी. मोहोड यांनी केली आहे. विशेष सांगायचे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनीच नागपुर वनविभागाने हि मोठी कारवाई केली आहे.

error: Content is protected !!