राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस मुख्यमंत्र्यांचे उत्तर

कमी बोलून जास्त काम करण्याचा निर्धार

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका असून कमी बोलून जास्त काम करायचे असे आम्ही ठरविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो’ या ओव्यांनी सरकारची पुढची वाटचाल स्पष्ट केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता. यावर 51 सदस्यांनी आपली मते मांडली.

राज्यपालांनी मराठीत अभिभाषण केले. त्यांना धन्यवाद देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संत गाडगेबाबांनी साध्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेल्याला अन्न देणे,तहानलेल्याला पाणी देणे, वस्त्र देणे, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देणे अशा पद्धतीचे काम सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्थगिती नव्हे प्रगती सरकार

आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून विकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील.

विकासाचा गोवर्धन पेलुयात

देशातील वैभवशाली आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा गोवर्धन पेलण्याकरिता सगळ्यांनीच एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतानाच हे सरकार राज्यातील जनतेला चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही,अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नवा महाराष्ट्र घडवतांनाच आपले राज्य अधिक महान होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

error: Content is protected !!